निर्विघ्नं कुरू मे देव

बाप्पांना देऊन पहिला मान

राखुया सारे निसर्ग भान..!!वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।

आपल्या संस्कृतीतले सर्व उत्सव हे जीवनात उत्साह, आनंद घेऊन येतात, सकारात्मक ऊर्जा , आशादायी विचार घेऊन येतात. त्यापैकीच एक महत्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव!!

आपल्या जीवनातील सर्व कार्य सुरळीत, आणि निर्विघ्न पार पाडावीत, सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी नांदावी; ह्यासाठी दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करतो.

ह्या उत्सवाच्या परंपरेनुसार आपण १० दिवस बाप्पांचे पूजन करतो आणि अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जन करून ह्या उत्सवाचा समारोप करतो.

पण ; ह्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारे गणपती मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात जल- प्रदूषणाचे कारण ठरत आहे...

"निर्विघ्न कुरुमे देव" अशी प्रार्थना ज्या देवाला आपण करतो त्याचाच उत्सव हा आपल्या काही चुकीच्या वर्तणुकिमुळे आपल्याच जीवनात विघ्नाचे कारण ठरावा हे आपल्याला आवडेल का???  

POP प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्ती मध्ये प्लास्टिक आणि सिमेंट च्या मिश्रणाचा वापर केला जातो, त्यामुळे साहजिकच ह्या मूर्तींच्या विसर्जनानंतर त्यांचे पुर्णतः विघटन होत नाही, किंबहुना ह्या विसर्जन केलेल्या मुर्त्या वर्षानुवर्षे तलावातून नदीत आणि मग समुद्रात अशा प्रवाहित होत जातात. 

PoP मध्ये कॅल्शियम सल्फेट हेमिहैड्रेट (calcium sulphate Hemihydrate) असल्यामुळे पाण्यात विरघळण्यासाठी त्याला अनेक वर्ष लागतात. समुद्रातील जीवसृष्टीचे जीवन त्यामुळे धोक्यात येत आहे.

ह्या मुर्त्यांमध्ये जे रंग वापरले जातात ते विषारी रसायनांपासून बनवलेले असतात आणि त्यामुळे समुद्रातील माश्यांचे, विविध जलचर जीवांचे जीवन संपुष्टात येत आहे.

जल प्रदूषणास कारणीभूत ह्या मुर्त्यांमुळे शेवटी आपल्या रोजच्या वापरातील पाण्यातील प्रदूषणाची पातळी (acidic level) वाढली आहे. त्यामुळे विविध त्वचा रोग, पोटाचे विकार वाढले आहेत.

  वरील सर्व दुष्परिणाम आणि निसर्गाची होणारे नुकसान लक्षात घेता, आपल्याला निसर्गाची हानी टाळण्यासाठी आणि आरोग्य संतुलन राखण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करणे ही आता काळाची गरज आहे..!

म्हणून आता गणपतीची मूर्ती घेताना केवळ आकर्षकता आणि आर्थिक मूल्य हे दोन हेतू लक्षात घेऊन चालणार नाही; तर निसर्गाचे रक्षण (निसर्गाला हानी होणार नाही) हा महत्वाचा मुद्दा लक्षातच ठेवला पाहिजे. 

आपण ही हानि कशी टाळू शकतो?

शाडू माती किंवा लाल माती बाजारात उपलब्ध आहे, तिचा वापर करून घरगुतीच गणपती बनवण्याचे कौशल्य आत्मसात करुया.

गणपती मूर्तीला सुशोभीकरण करण्यासाठी केमिकल विरहित रंगांचा वापर करुया.

गणेश मूर्ती बाजारातून विकत घ्यायची असल्यास शाडू माती चे गणपती , किंवा नदी पात्रातील लाल माती ने बनवलेल्या मूर्ती ह्या१००% eco-friendly पर्यायांना प्राधान्य देऊया. 

"घरगुती विसर्जन सोहळा!"

अनंत चतर्दशीला विसर्जनाच्या वेळी घरीच एखाद्या कुंडीत गणेश मूर्तीचे विसर्जन करुया आणि नंतर त्या कुंडीत छानसे रोपटे लावून त्याची नियमित आवश्यक ती निगा राखूया.

सार्वजनिक ठिकाणी विसर्जन!

निर्माल्य, फळे/फुले/हार हे जरी निसर्गतः विघटन होणारे असेल तरी ते नदी पत्रात न फेकता प्रशासनाने ठरवून दिलेल्या "निर्माल्य संकलन" ठिकाणी जमा करुया. तसेच Single Used Plastic सुद्धा इतरत्र न फेकता कचरा संकलन केंद्रात देऊयात.

विसर्जनाच्या वेळी POP मूर्ती ही तलावात किंवा नदीत विसर्जित न करता, प्रशासनाने नेमून दिलेल्या किंवा स्वयंसेवी संस्थांनी नेमलेल्या जागेतच संकलन करुया.

बुद्धीच्या ह्या देवतेचे आत्ता निर्बुद्धपणे पूजन न करता, निसर्गाला अपाय होणार नाही ह्याची दक्षता घेऊयात!

निसर्गाला अपाय म्हणजेच, संपूर्ण जीव सृष्टीला अपाय हे कटाक्षाने लक्षात ठेवूया.

आजपर्यंत निसर्गात भोगाची दृष्टी घेऊन जगणाऱ्या आपल्या मानवजातीला आता डोळसपणे निस्वार्थ वृत्तीने निसर्गाच्या संवर्धनासाठी एकनिष्ठ होण्याची गरज आहे.

उशीर झालेला आहे, पण अजूनही वेळ हातात आहे..!

 जागे होवूया, निसर्ग वाचवूया!! 

- चेतन कोठावदे


Popular posts from this blog

Rekrit’ Paper pens - Wise Option Against Plastic pens! (Article by: Mr. Chetan Kothavade , Founder; Eco-Trust, Pune)

Rekrit Paper pencils – Upcycling waste paper for the better tomorrow! (Article by: Mr. Chetan Kothavade , Founder; Eco-Trust, Pune)